चिखलीत मुस्लिम कुटुबांना पाण्यापासून वंचित ठेवले; एमआयएमचा गंभीर आरोप

0
201

चिखली, दि. १४ (पीसीबी) – चिखलीतील मुस्लिम कुटुबांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप एमआयएमने केला आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी चारी खोदण्याचे काम सुरु असताना भाजपच्या माजी महापौराने हे खोदकाम अडवले आहे. माजी महापौराने शिफारस केल्यानंतरच नळजोड दिले जाईल, असे महापालिका अधिका-यांकडून सांगितले जात असल्याचाही आरोप केला.

एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिखलीच्या चौधरी वजनकाटा या ठिकाणी शेकडो मुस्लिम कुटूंबिय वास्तव्यास आहेत. तेथील चौधरी वस्तीतील 135 कुटुंबियाना महापालिकेचे पाणी मिळावे म्हणून कित्येक वर्ष प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्या मुस्लिम कुटुंबियाना आजतागायत महापालिकेचे पाणी मिळू नये म्हणून पाणी पुरवठ्याचा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता हे राजकीय दबावाखाली येवून पाण्यापासून वंचित ठेवत आहेत.

चौधरी वस्तीत मुस्लिम कुटुंबाना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पुरेसा पिण्यासाठी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे कायमस्वरुपी पाईपलाईन टाकून प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोड देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले. सध्यस्थितीत महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे चौधरी कुटूंबियाच्या वतीने एकत्रितपणे 130 नळ कनेक्शन मिळावे म्हणून रितसर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज केला. सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर नळ कनेक्शन देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांची भेट देऊन पाईपलाईन भूमीगत करण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावर पाणी पुरवठा विभागाकडून चौधरी वस्तीसाठी नवीन पाईपलाईन भूमीगत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

पाईपलाईन टाकण्यासाठी चारी खोदण्याचे काम सुरु असताना भाजपचे माजी महापौर राहूल जाधव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हे खोदकाम अडवले आहे. संबंधित कनिष्ठ अभियंत्याला सांगून जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत हे काम करायचे नाही, असा दम भरला. त्यावर पाईपलाईनसाठी खोदलेली चारी देखील त्या अधिका-यांनी बुजवून टाकले आहे. याबाबत चौधरी कुटूंबियानी वरिष्ठ अधिका-यांना कळविले. त्या अधिका-यांची याबाबत तक्रार केली. अधिका-यांनी देखील राजकीय दबावाखाली येऊन हे काम पुन्हा सुरु करण्यास नकार दिला.

जोपर्यंत माजी महापौर सांगत नाहीत, तोपर्यंत हे काम करता येणार नसल्याचे सांगत पाणी पुरवठा विभागातील उप अभियंत्याने माघार घेतली. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी नळजोड देण्याची रितसर मागणी करणा-या चौधरी वस्तीतील 135 कुटुंबियांवर अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. राजकीय दबावापोटी चिखलीतील चौधरी वस्तीत 135 कुटुंबियांना नळ जोड देण्याचे काम महापालिकेने थांबविले आहे. तातडीने पाईपलाईन टाकून नळ कनेक्शन देवून पाणी पुरवठा सुरु करावा, अन्यथा सर्व मुस्लिम बांधवाना घेवून आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.