निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निशेधार्थ पुण्यात शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) निदर्शने

0
259

पुणे, दि. १८ (प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री बरोबर एकनिष्ठ आहे. भविष्यात मिंधे सरकारला त्यांची जागा दाखवल्या शिवाय सच्चा शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने काल (दि. १७) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळळी असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या निशेधार्थ पुणे शहर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक येथे निदर्षने करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, महिला शहर संघटिका पल्लवी जावळे, राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, युवा शहर अधिकारी निकिता मारतकर ,युवराज पारीख, छाया भोसले, नंदू येवले, गजानन पंडित, परेश खंडके, तानाजी लोहकरे, मकरंद पेठकर, तेजस मर्चंट, विलास सोनवणे, राजेश मोरे, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, युवराज शिंगाडे, करूणा घाडगे, वैजयंती फाटे, दिपाली राऊत, गायत्री गरुड, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो या भीतीपोटीच मिंधे सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून धनुष्यबाणावर घाला घातला आहे. कालच्या निर्णयानंतर प्रत्येक शिवसैनिक पटून उठला असून तो मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. चिन्ह चोरणारे ४० चोर आणि भाजप यांना जमिनीत गाडल्या शिवाय सामान्य शिवसैनिक गप्प बसणार नाही. याची सुरूवात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी पासून करणार आहे. या पोटनिवडणुकीत मिंधे सरकार आणि भाजपला चारीमुंड्या चित केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

थरकुडे म्हणाले, चिन्ह गेले म्हणून गळून जाणारे आम्ही लेचेपेचे शिवसैनिक नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आगामी काळात या मिंधे सरकार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

यावेळी ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची नाही गद्दारांच्या बापाची’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चिन्ह आणि नाव चोरणार्‍या गद्दारांचा धिक्कार असो’, ‘५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या