चिंचवड, कसबा महाविकास आघाडी एकत्रित लढणार

0
281

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रित लढणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याचे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

अमरावती आणि नागपूर महत्वाच्या जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या
विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. एक जागा भाजपने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूर महत्वाच्या जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. या जागा महाविकास आघाडीतील एकीमुळं जिंकल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ असे संजय राऊत म्हणाले. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी कोणाला यावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ असे राऊत म्हणाले.