चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. तिथे भाजपा निर्विवाद विजयी होईल

0
304

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – “चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. तिथे भाजपा निर्विवाद विजयी होईल. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनी जगताप यांना मतदार निवडून देतील,” असा विश्वास भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

गिरीश महाजन यांनी आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. भाजपा कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही आहे, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले की, तिकीट जाहीर झाल्याने अश्विनी जगताप यांना भेटायला आलो. चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपाचा विजय नक्की होईल, यात काही शंका नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे अपूर्ण काम आणि अपूर्ण स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मतदार त्यांच्या पत्नीला निवडून देतील. शंकर जगताप यांच्याशी माझी तीन- चार वेळेस भेट झाली. जगताप कुटुंबात कुठलाही संघर्ष नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप होते तसेच अजून हे कुटुंब आहे. उलट शंकर जगताप यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्या हातात निवडणुकीची धुरा दिलेली आहे. हे सर्व जण जोरात प्रचाराला लागतील. दरम्यान, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही महाराष्ट्राची प्रथा, परंपरा आहे. मुंबई ची जागा आम्ही बिनविरोध दिली. तिथे, आमचा उमेदवार उभा केला नव्हता. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे. काही ठिकाणी अपवाद आहेत. इथं बिनविरोध व्हायला हवी असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.