वर्गीकृत कचऱ्यासाठी 1 एप्रिलपासून मोजावे लागणार पैसे

0
267

पिंपरी, दि.९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना वर्गीकृत कचऱ्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून दरमहा 60 रूपये मोजावे लागणार आहेत. तर, उर्वरित आस्थापनांना 2 हजार रूपयापर्यंत शुल्काची रक्कम असणार आहे. हे शुल्क कर आकारणी बिलांमधून आकारण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील तरतूदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय इ. ठिकाणी उत्पन्न होणारा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या महापालिकांसाठी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी 1 जुलै 2019 नुसार उपयोग कर्ता शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका सभेने 20 नोव्हेंबर 2021 रोजी मान्यता दिली आहे.

त्यानुसार आता महापालिका वर्गीकृत कचऱ्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून दरमहा सेवा शुल्क आकारणार आहे. तसेच हे शुल्क महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणी बिलामधून वसूल करण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती सूचनांचा विचार केला जाणार नाही. या नवीन शुल्क वाढीत घरटी 60 रूपये शुल्क घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एका वर्षांसाठी 720 रूपये अधिकचे पालिका तिजोरीत भरावे लागणार आहेत.

किती आहे सेवाशुल्क?

घरटी 60 रूपये, दुकाने, दवाखाने यांना 90 रुपये, शोरुम (उपकरणे, फर्निचर, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स) 160 रुपये, गोदामे 160 रुपये, उपहारगृहे व हॉटेल 160, राहण्याची व जेवणाची व्यवस्था असलेले हॉटेल 200 रुपये, 50 खाटांपेक्षा कमी संख्या असलेल्या रुग्णालयांना 160, 50 खाटांपेक्षा जास्त 240, शैक्षणिक संस्था, वसतीगृहे 120, धार्मिक संस्था 120, शासकीय, निमशासकीय कार्यालये 120, विवाह कार्यालये, मनोरंजन सभागृहे, एक पडदा चित्रपटगृहे 2 हजार, खरेदी केंद्र, बहुपडदा चित्रपटगृहे 2 हजार आणि फेरीवाल्यांना 180 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर, हंगामी दुकाने किंवा आनंद मेळा, सस्तंग, खाद्य महोत्सव, फटाक्याचे दुकाने यांना मासिक शुल्क न आकारता एक वेळ शुल्क निर्धारित केले जाणार आहे.