भरपाई मागितल्याने कार चालकास बेदम मारहाण

0
442

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – ट्रकने एका कारला धडक दिली. कारचे नुकसान झाल्याने कार चालक डॉक्टरने ट्रक चालकाकडे नुकसान भरपाई मागितली. त्यावरून ट्रक चालकाने डॉक्टरला मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांनतर साथीदारांना बोलावून घेत पुन्हा मारहाण करून डॉक्टरला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास बावधन-भूगाव रोडवर बावधन येथे घडली.

डॉ. संदीप चक्रधर मेहरे (वय ५०, रा. बावधन, पुणे) असे जखमी कार चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मेहरे हे त्यांच्या कार मधून जात असताना त्यांच्या कारला ट्रकने (एमएच १२/क्यूडब्ल्यू ३७४०) धडक दिली. त्यात कारचे नुकसान झाल्याने मेहरे यांनी ट्रक चालकाकडे नुकसान भरपाई मागितली. त्यावरून ट्रक चालकाने मेहरे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या तीन साथीदारांना बोलावून घेत त्या साथीदारांनी देखील मेहरे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. यात मेहरे यांच्या हाताला, छातीला, पायाला, पोटाला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.