स्ट्रॉंग रूमची तयारी, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापनाची उमेदवारांना दिली माहिती

0
197

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण, निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमवेत निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय,थेरगांव येथे बैठक पार पडली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी या बैठकीत निवडणूक विषयक पुढील प्रक्रिया आणि उमेदवारांनी करावयाच्या आवश्यक बाबींची माहिती दिली. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच वाकड, सांगवी, देहूरोड, चिंचवड, हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उमेदवाराने ठेवायच्या दैनंदिन खर्चाच्या पद्धती, स्ट्रॉंग रूमची तयारी, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, आदी विविध विषयांची सचिन ढोले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ईव्हीएम यंत्र स्थलांतरीत करताना तेथे उमेदवारांना उपस्थित राहता येईल. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन ही संवेदनशील बाब असून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे त्यादृष्टीने तंतोतंत पालन केले जाईल. ईव्हीएम यंत्र व्यवस्थापनाची सर्व प्रक्रिया उमेदवारांना पूर्व सूचना देवूनच केली जाईल. मतदान यंत्राची सरमिसळ करताना उमेदवारांना उपस्थित राहता येईल. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यास आम्ही कटिबद्ध असून सर्व प्रक्रिया सूत्रबद्ध पद्धतीने कायदा व सुव्यवस्था राखत पार पाडण्यात येईल.

 उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खर्चाची मर्यादा आणि त्याचे दरपत्रक यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले असून त्याप्रमाणे उमेदवाराने स्वतंत्र प्रतिनिधी नेमून दैनंदिन अहवाल निवडणूक खर्च कक्षाकडे सादर करावा. कोणतीही अडचण आल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन ढोले यांनी यावेळी केले. उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेली माहितीदेखील यावेळी देण्यात आली.