अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांची नियुक्ती रद्द; स्मिता झगडे यांचा मार्ग मोकळा

0
426

पिंपरी दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)ने दणका दिला आहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती रद्द केली. महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांना आजपासून दोन आठवड्यात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश मॅटने राज्य सरकारला दिले आहेत.

महापालिकेत उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करुन घेतले नाही. त्यानंतर राज्य शासनाने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. दुस-याच दिवशी जांभळे पालिकेत रुजू झाले. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते. झगडे यांनी राज्य सरकार, प्रदीप जांभळे आणि महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी केले होते.

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)चे सदस्य ए.पी. कु-हेकर यांच्या खंडपीठापुढे त्याबाबत सुनावण्या झाल्या. 14 फेब्रुवारीपासून सलग तीनदिवस सुनावणी झाली. स्मिता झगडे यांच्या वतीने अॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली. उपायुक्त स्मिता झगडे यांना आजपासून दोन आठवड्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश ए.पी. कु-हेकर यांनी राज्य शासनाला दिले आहेत.