सोसायटीच्या जागेची नोंद उताऱ्यावर करण्यासाठी मागितली लाच

0
243

रावेत, दि. ८ (पीसीबी) – रावेत येथील एका सोसायटीच्या जागेची नोंद सात बारा उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या मदतनीसाने ३५ हजारांची लाच मागितली. त्याने ही लाच तलाठ्यासाठी मागितली असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची २६ डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावर चौकशी झाल्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन ढमाले असे गुन्हा दाखल झालेल्या मदतनीसाचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली आहे.

एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढमाले हे किवळे तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करत होते. रावेत येथील सोसायटीच्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ढमाले याने ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार ३३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार एसीबीने २६ डिसेंबर २०२२ रोजी पडताळणी केली. ढमाले याने तक्रारदार यांच्याशी चर्चा करून किवळे तलाठी यांच्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीतून समोर आले. त्यानुसार याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.