Breaking News | स्टील कंपनीत भट्टीचा भीषण स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

0
312

जालना,दि.०१(पीसीबी) – जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळच्या सुमारास स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. यामध्ये आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अनेक कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीत आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कामगार मृत्युमुखी पडले असून अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षतेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक भीषण स्फोट घडत आहेत. यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा कारवाईची मागणी केली.

मात्र, याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते. कंपनी प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या अर्थपूर्ण देवाण-घेवाणीने या प्रकरणावर पडदा टाकला जातो. पोलीस प्रशासन कंपन्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये कामगारांचा नाहक बळी जात असल्याचे दिसून येते. प्रशासन आणखी किती कामगारांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल यानिमित्याने उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने कंपनी मालक व अधिकारी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.