चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होवून अनेक दिवस उलटले मात्र अजून पर्यंत कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. मात्र पुण्यात आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली आणि या पोटनिवडणुकांसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होतील असं अश्वासन त्यांनी दिले. उमेदवारांची नावे आज सायंकाळ पर्यंत येतील आणि उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केले जातील, असे सांगण्यात आले.
चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येत्या ६ तारखेला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करू, अजून पर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील. इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत आहे. या दोन्ही जागांसाठी ६ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ ठरवली आहे. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार आहे.
दरम्यान, महाआघाडीत कसबा काँँग्रेसकडे आणि चिंचवड राष्ट्रवादीकडे असे वाटप जवळपास निश्चित झाले आहे. चिंचवडमध्ये शिवसेनेकडून इच्छुक राहुल कलाटे हे महाआघाडीच्या बैठकिला उपस्थित होते, त्यामुळे त्यांचे नाव महाआघाडीतून अंतिम होणार असल्याचे समजले. मुंबई येथे याच विषयावर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. कसब्यात काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत अद्याप साशंकता आहे.