भाजपचे उमेदवार, आज चंद्रकांंत पाटील यांच्या घरी बैठक

0
221

पुणे, दि. २३ (पीसीबी) – पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी आयोजित बैठकित त्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

सध्या पोटनिवडणूकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळकची सध्या चर्चा रंगली आहे. चिंचवडमधून आमदार जगताप यांच्या पत्नी आश्विनी, धाकटे भाऊ शंकरशेठ तसेच जगताप कुटुंबाच्या बाहेरील पर्यायी नाव म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांची नावे चर्चेत आली आहेत.

मुक्ता टिळक यांच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यासंबधी आज भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. पुण्यातील भाजपचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येईल. त्याचबरोबर या बैठकीत कोणती नावे चर्चेत आहेत याबद्दलही चर्चा आणि तया नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.