पुणे, दि. २१ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुणे महापालिकेतील सत्तेची गणितं पुन्हा बदलू लागली आहेत. काही दिवसापूर्वी पुण्यातल्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुणे भाजपात पुन्हा इन्कमिंगला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराचे उपमहापौर राहिलेले आबा बागुल यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने खळबळ आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी पुण्यातल्या भाजपामधून तब्बल 25 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर होते. मात्र, सहा महिन्यापूर्वी सत्तांतर झालं आणि चित्र पुन्हा पालटलं. आता या 25 जणांनी राष्ट्रवादीत जाण्याचा बेत रद्द केल्याचं दिसत आहे.याउलट
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील किमान 25 ते 30 जण भाजपात येण्याची तयारी करत आहेत.
वास्तविक आत्ता निवडणुकीचे वातावरण नाही. निवडणुका कधी होतील हे निश्चितपणे कुणालाही सांगता येत नाही. प्रभाग रचना नव्याने होणार का ? प्रभाग तीन की चार सदस्यांचा हे आता निश्चितपणे कुणीच सांगू शकत नाही. मात्र,काहीही झालं तरी भाजपात जाऊन उमेदवारी मिळवण्याची तयारी अनेकजण आतापासूनच करीत आहेत. भाजपात जाऊ इच्छिणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता भाजपच्या (BJP) एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.
महापालिकेच्या निवडणुका कधी होतील याची निश्चित माहिती आज कुणाकडेच नाही.सर्वोच्च न्यायालयात निकाल काय लागतो.यावर निवडणुका कधी होणार हे ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही माजी नगरसेवक भाजप प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक भेटत आहेत. आरक्षण आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर यातील बहुतेकांचे प्रवेश होणार असल्याचे भाजपच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले.
पुणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यामध्येदेखील मतभेद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र लढ्याचा विचार अनेक वेळा बोलून दाखविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित लढणार की नाही याबाबत देखील संभ्रम आहे. आघाडी होणार या भीतीने राष्ट्रवादीमधील अनेकजण धास्तावले आहेत.आघाडी झाली तर आपल्याला उमेदवारी मिळेल का ? हे त्यांच्या धास्तावण्याचे कारण आहे. त्यामुळे यातील अनेकांनी भाजपची वाट धरण्याची तयारी सुरू केली आहे.