राहुल गांधी यांचा फोन येताच बाळासाहेब दाभेकर यांंची माघार

0
353

पुणे, दि. ९ (पीसीबी) – कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
दाभेकर यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, उमेदवारी मागे घेतल्यानंतर स्वतः दाभेकर यांनी बदललेल्या निर्णयाचे कारण स्पष्ट केलं.

जेव्हा राहुल गांधी यांचा फोन येतो….

उमेदवारी मागे घेतल्यानंतर दाभेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या 40 वर्षापासून पक्षासाठी काम करत आहे आणि जेव्हा आम्ही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती, तेव्हा मला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मी पक्षाच्या अंतर्गत गटबाजी मुळे बंड पुकारलं होतं, पण एका कार्यकर्त्याला जेव्हा राहुल गांधी यांचा फोन येतो, ही खूप गर्वाची बाब आहे, म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे, असं दाभेकर म्हणाले.

कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या दाभेकर यांनी काँग्रेसकडे आपली उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली.

दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दाभेकर यांची मनधरणी सुरू होती, पण ते अपक्ष लढण्यावर ठाम होते. काल रात्री काँग्रसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आल्याने दाभेकर यांनी आपल उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.