येरवडा, दि. ४ (पीसीबी) – मोक्कामध्ये येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात गुंड नाना गायकवाड याच्यावर येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीने हल्ला केला. यात नाना गायकवाड जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खोली क्रमांक एक समोर घडली.
सुरेश बळीराम दयाळू असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कारागृह हवालदार सुभाष मानसिंग दरेकर (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास खोली क्रमांक एक आणि १२ येथे कैदी स्वच्छतेचे काम करत होते. त्यावेळी नाना गायकवाड खोली क्रमांक एक समोर बसला होता. दरम्यान तिथे आलेल्या सुरेश दयाळू याने पत्र्याच्या तुकड्याने नाना गायकवाडवर हल्ला केला. यात नाना गायकवाडच्या गालावर दुखापत झाली आहे.
नाना गायकवाड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १४ गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नाना गायकवाडवर हल्ला होण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.












































