उसन्या पैशांवरून मित्रावर कुऱ्हाडीने हल्ला, १० लाखांचा ऐवज घेऊन हल्लेखोर मित्र पसार

0
310

आळंदी, दि. १२ (पीसीबी) – उसन्या पैशांच्या कारणावरून मित्राने मित्रावर कुऱ्हाडीने जिवघेणा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मित्राची कार, रोख रक्कम, मोबाईल असा दहा लाखांचा ऐवज घेऊन मित्र पळून गेला. ही घटना शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री वडगाव घेनंद येथे घडली.

गिरीश विठ्ठल ढोमे (वय २६, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ गोरख बिबे (वय २२, रा. मोशी प्राधिकरण. मूळ रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढोमे आणि सौरभ हे मित्र आहेत. त्यांच्यातील उसन्या पैशांच्या व्यवहारातून सौरभ याने कुऱ्हाडीने ढोमे यांच्या हातावर, खांद्यावर, डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. ढोमे यांची एमएच १४/एचक्यू ७२७१ कार, कारमध्ये असलेली दीड लाख रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन असा दहा लाख रुपयांचा ऐवज घेऊन सौरभ निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.