अश्विनी जगताप विरुध्द राहुल कलाटे, दुरंगी सामना

0
317

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकिसाठी भाजप आपले अधिकृत उमेदवार आज दिल्लीतून जाहीर केले. आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, महाआघाडीतून सर्वपक्षाचे उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांचे नाव निश्चित करण्यात आले, मात्र अधिकृत घोषणा बाकी आहे. जगताप विरुध्द कलाटे असा दुरंगी सामना रंगणार हे जवळपास नक्की आहे.

चिंचवड पोटनिवडणुकिसाठी आजवर ९० उमेदवारांनी अर्ज घेतल्याने रेकॉर्ड झाले. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी आहे. मतदान २६ फेब्रुवारी आणि मतमोजणी २ मार्च रोजी आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणूक होणार अशा बातम्या भाजपने पेरल्या होत्या, पण महाआघाडीचा आमदार होऊ शकतो असा अंदाज आल्यावर जोरदार हालचाली सुरू झाल्या. भाजपमध्ये जगताप यांच्या कुटुंबातच उमेदवारी देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील जाहीर केले होते. अश्विनी जगताप यांचे नाव निश्चित होणार समजल्यावर जगताप यांचे बंधू शंकरशेठ यांनी मोर्चेबांधनी सुरू केली. भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ सुरु आहे असे लक्षात आल्यावर राष्ट्रवादीमधून इच्छुकांची संख्या वाढली. नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे आदींसह नऊ जणांनी उमेदवारीसाठी इच्छा प्रकट केली. अजित पवार यांनी सर्वांच्या मुलाखती घेऊन महाआघाडीच्या वतीने एकच नाव अंतिम करणार असल्याचे सांगितल्यावर चुरस वाढली.

दरम्यान, महाआघाडीच्या वतीने शिवसेनेचे राहुल कलाटे यांना संधी दिली तर भाजपला शह मिळेल, असे सर्वेक्षण आले. त्यातून कलाटे यांचे नाव निश्चित कऱण्यात आले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. आज सायंकाळ पर्यंत कलाटे यांच्या नावाची घोषणा होणार आहे. महाआघाडीत कसबा काँग्रेसकडे आणि चिंचवड राष्ट्रवादीकडे असे वाटप शुक्रवारी करण्यात आले. आता उमेदवारीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून कलाटे यांचे नाव जाहीर करणार आहेत.

राहुल कलाटे २०१४ आणि २०१९ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात मोठी मते घेतली. पहिल्यांदा शिवसेना म्हणून कलाटे यांना ६७ हजार मते मिळाली. नंतर २०१९ मध्ये सर्वपक्षिय अपक्ष म्हणून अपक्ष कलाटे यांना १ लाख १२ हजार इतकी मते मिळाली होती. राज्यात सर्वाधिक मते मिळविणारे अपक्ष उमेदवार अशी कलाटे यांची नोंद आहे. मागचा दोन निवणुकांचा अनुभव विचार घेऊन कलाटे हेच ताकदिचे उमेदवार असल्याचे लक्षात आले. आता ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरणार असे दिसते.