कॉंग्रेस कार्यकर्त्याला अटक करणं पडलं महागात; पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून पैसे वसूल करण्याचे दिले आदेश

0
298

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता.

यावेळी एका कॉंग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. मात्र या पोस्टमुळे कॉंग्रेस कार्यकर्ते संदीप कुदळे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने संदीप कुदळे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर संदीप कुदळे यांनी केली होती सोशल मीडियावर पोस्ट लिहून रोष व्यक्त केला होता. त्यानंतर कुदळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. कुदळे यांनी आरोप केला की, सूचना न देता आणि आयपीसीच्या कलम 153A अन्वये गुन्हा असूनही त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपींठापुढे सोमवारी सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी संदीप कुदळे यांच्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले.

तसेच बेकायदेशीररित्या अटक केल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून 25 हजार रूपये वसूल करण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत.