मालमत्तेला लिंक केलेला चुकीचा मोबाईल नंबर अपडेट करण्याचे पालिकेचे आवाहन

0
482

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मालमत्ता असणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्यांचा मोबाईल नंबर हा मालमत्तेला लिंक करावा. तसेच ज्यांनी मालमत्तेला चुकीचा मोबाईल नंबर लिंक केला आहे, त्यांनी तो अपडेट करावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीची जोरदार मोहिम हाती घेतली आहे.

मालमत्ताधारकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मालमत्ता कर भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच वारंवार आवाहन करूनही जे मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करतात, अशा मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्ती करणे आदी कारवाईही केली जात आहे.

त्यातच बहुतांश मालमत्ताधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक हा मालमत्तेला लिंक न केल्यामुळे त्यांना कर संकलन विभागाकडून पाठवण्यात येणारे एसएमएस प्राप्त होत नाहीत. तसेच काहींनी मालमत्तेला चुकीचा मोबाईल क्रमांक लिंक केले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती मिळत नाही.

मोबाईल नंबर लिंक न केलेल्या, तसेच चुकीचा मोबाईल नंबर अपडेट न केलेल्या मालमत्ताधारकांकडे कर थकबाकी असल्यास जेव्हा कारवाई करण्यासाठी कर संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जातात, तेव्हा मालमत्ताधारकांकडून मोबाईल नंबरवर एसएमएस न आल्याची तक्रार केली जाते.

अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. परंतु संबंधित मालमत्तेचा कर थकबाकी असल्यामुळे कर संकलन विभागाला नियमानुसार कारवाई करावी लागेत. पण मालमत्तेला योग्य मोबाईल क्रमांक लिंक असल्यास मालमत्ताधारकांना कर संकलन विभागाकडून पाठवण्यात येणारी माहिती वेळेवर मिळेल, व असे प्रसंग उद्भवणार नाही. त्यामुळेच लवकरात लवकर मालमत्ताधारकांनी त्यांचा मोबाईल नंबर हा मालमत्तेला लिंक किंवा अपडेट करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल नंबर अपडेट का करावा?

मालमत्तेला मोबाईल क्रमांक लिंक असल्यामुळे संबंधित मालमत्तेच्या माहितीचा तपशील मिळतो. जर एखाद्या मालमत्ताधारकाने त्याच्या मालमत्तेला चुकीचा मोबाईल नंबर लिंक केला असेल, तर तो नंबर वापरत असलेल्या व्यक्तीला संबंधित मालमत्तेची माहिती मिळू शकते. असे प्रकार घडल्याबाबतच्या तक्रारीही कर आकारणी व कर संकलन विभागाकडे आल्या आहेत.

त्यामुळेच मालमत्ताधारकांनी स्वतःच्या मालमत्तेला तो वापरत असलेला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. तसेच यापूर्वी मालमत्तेला लिंक केलेला क्रमांक हा संबंधित मालमत्ताधारक वापरत नसेल, तर अशा मालमत्ताधारकाने तात्काळ त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

मालमत्ताधारकांना कुठल्याही कारणामुळे त्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या मालमत्तेला लिंक करण्यास किंवा अपडेट करण्यास अडचणी येत असतील, तेव्हा संबंधित मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन संपर्क करावा. तसेच त्याठिकाणी आपला मोबाईल क्रमांक हा स्वतःच्या मालमत्तेला लिंक करण्यासाठी किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी रितसर अर्ज द्यावा.

असा करा मोबाईल नंबर अपडेट

http://103.224.247.135:8081/PropertyTaxService/?wicket:bookmarkablePage=:com.pcmc.propertytax.ptaxservices.PropertytaxKYC या वेबसाइटवर जाऊन नागरिक>मिळकत कर> मोबाईल जोडा अशी प्रक्रिया करुन मोबाईल अपडेट करता येईल.