जगताप कुटुंबाच्या विरोधात घरातूनच दुसरे जगताप रिंगणात उतरणार

0
269

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून पिंपरी- चिंचवड शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. चिंडवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे.भाजपाकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप किंवा जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असं असतांना जगताप कुटूंबीयांना आव्हान देण्यासाठी जगताप यांचे चुलत बंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप हे पोटनिवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील आणला असून जगताप कुटूंबाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

१९८६ पासून कार्यरत असलेले राजेंद्र जगताप हे लक्ष्मण जगतापांच्या तालमीत तयार झाले असून निवडणूक कशी लढवायची आणि कशी जिंकायची हे माहिती असल्याचे ते सांगतात. “जगताप यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत, उमेदवारी द्यायची की नाही हा पक्षाचा निर्णय असेल ” असं राजेंद्र जगताप यांनी सांगितलं आहे.

आजवरच्या बहुतांश निवडणुकीत प्रचार, प्रसाराची सर्व यंत्रणा राजेंद्र जगताप सांभळत होते. महापालिकेत कुठलेही महत्वाचे पद आपल्या वाट्याला आले नाही, उलटपक्षी फार मोठी उपेक्षा झाल्याची खंत राजेंद्र जगताप यांना आहे. पिंपरी गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरात अफाट जनसंपर्क आणि सुलभ कार्यपध्दतीने लोक आपल्या बरोबर असल्याचा त्यांचा दावा आहे. परिसरातील अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये राजेंद्र जगताप यांचा पुढाकार असतो. आमदार जगताप कुटुंबाला शह देण्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील म्हणूनही राजेंद्र जगताप यांच्या नावावर चर्चा सुरू आहे.