AI म्हणजे संकट नव्हे, स्मार्ट सहकारी – आयुक्त शेखर सिंह

0
6
  • महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराचे प्रशिक्षण…*

पिंपरी, दि. 5– कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाविषयी सध्या समाजमाध्यमांवर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक मतप्रवाह दिसत आहेत. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ भविष्यातील कल्पना न राहता, प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा एक आवश्यक भाग बनत आहे. AI म्हणजे संकट नव्हे, तर तो आपला स्मार्ट सहकारी आहे जो कार्यालयीन कामकाज अधिक जलद, सुलभ आणि अचूक बनवतो. त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञानस्नेही होणे ही काळाची गरज आहे. AI चा योग्य वापर करून आपण आपल्या कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता निश्चितच वाढवू शकतो. तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज दूर करून, त्याची अचूक समज घेतल्यास ते आपल्याला अधिक सक्षम बनवू शकते, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुयोग्य माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर’ या विषयावर आधारित सखोल प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

या प्रशिक्षणात महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे व पुणे आणि उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, सचिन पवार, प्रदीप ठेंगल, उमेश ढाकणे,निलेश बधाणे, सीताराम बहुरे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अविनाश शिंदे, विजयकुमार थोरात,निवेदिता घारगे, अमित पंडित,अजिंक्य येळे,विजयकुमार थोरात, नाना मोरे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, शीतल वाकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कार्यकारी अभियंता आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील प्रशासनाचे बळ आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी परिचित करण्यात येत आहे. हे कौशल्य भविष्यातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी उपयोगी ठरेल. याशिवाय, हे प्रशिक्षण डिजिटल भारत मिशनच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, पिंपरी चिंचवड महापालिका डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या युगातील प्रशासनासाठी तयार ठेवणे ही काळाची गरज आहे.

महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व नागरिक केंद्रित बनविण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (AI) चा वापर करावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे व पुणे आणि उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम या तज्ज्ञांनी विविध उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले. यात प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सेवांची गुणवत्ता, गती, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता कशी वाढवता येते, याबद्दल प्रत्यक्ष उदाहरणांसह चर्चा करण्यात आली.

या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ChatGPT, Bhashini, Digilocker APIs, आणि इतर ई-गव्हर्नन्स टूल्सचे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या आगामी योजनांमध्ये यापैकी अनेक साधनांचा समावेश करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्याचा महापालिकेचा मानस आहे.

प्रशिक्षणातील महत्वाचे मुद्दे:

• कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय? – एआयची कार्यप्रणाली, प्रकार (Narrow AI, General AI), आणि सरकारी कामकाजातील त्याचा वापर.
• प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व – कार्यक्षमता वाढवणे, मानवी चुका कमी करणे, नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा पुरवणे.
• डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया – Open Government Data, Big Data Analytics आणि त्याचा धोरणनिर्मितीवर होणारा परिणाम.
• कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ChatGPT चा वापर – शासकीय पत्रव्यवहार, अहवाल लेखन, योजना प्रस्तावना, नागरिक तक्रार निवारण इत्यादींसाठी.
• डिजिटल गव्हर्नन्स – e-Governance चा प्रभाव, डिजिटल लीडरशिप आणि स्मार्ट सिटीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका.
• AI वापराचे धोके आणि जबाबदाऱ्या – गुप्तता, नैतिकता, चुकीची माहिती आणि नियमन.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कामकाजातील अनेक प्रक्रिया उदा. नोंदी व्यवस्थापन, पत्रव्यवहार, अहवाल लेखन, नागरिकांच्या तक्रारींचे विश्लेषण अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक पद्धतीने करू शकतील. चॅट जीपीटी सारखी साधने शासकीय मजकूर तयार करण्यात वेळ व कष्ट वाचवतात, तर डेटा विश्लेषण टूल्स धोरणनिर्मितीत मदत करतात. हे तंत्रज्ञान केवळ भविष्य नाही, तर आजच्या कामाचा एक भाग बनू लागले आहे. यापुढेही महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात येणार आहे.

  • निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

१०० दिवस कार्यक्रमात राज्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अव्वल

राज्यातील प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने १०० दिवसाचा उपक्रम हाती घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या अंतर्गत डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकता, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता सुधारणा, जनता तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुधारणा, स्मार्ट शहर सुरक्षा आणि सार्वजनिक जागा सुधारणे, तंत्रज्ञानाधारित सुधारणा आणि महसूल वाढ या सर्व कामांच्या सुधारणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) वापर करण्यात येत आहे. दरम्यान या १०० दिवसाचा उपक्रमांच्या मध्यावधी आढावा बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले असून महानगरपालिकेच्या उपक्रमाबद्दल समाधान देखील व्यक्त केले आहे.