हाऊसिंग सोसायट्यांचे पुन्हा `नो वॉटर नो व्होट`, पाणी प्रश्नावर भाजपची कोंडी, हक्काच्या मतदारांची आता बहिष्काराची भाषा

0
441

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील रावेत, किवळे, ताथवडे, चिंचवड, थेरगाव, काळेवाडी वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, सांगवी, नवी सांगवी परिसरातील सुमारे ६ हजार ५०० हाऊसिंग सोसायट्यांचे सुमारे अडिच-तीन लाख मतदान यावेळी अत्यंत निर्णायकी ठरणार आहे. या सोसाट्यांचा पाणी प्रश्न गेले पाच वर्षांपासून कायम असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने भाजपमध्ये घबराट आहे.

आश्वासनांपलिकडे या नागरिकांना काहीच मिळाले नाही म्हणून ते नाराज आहेत. २४ बाय सात पाणी मिळणेतर सोडाच उलट दिवसाआड पाणीसुध्दा पुरेसे मिळत नसल्याने पाणी टँकरवर दरमहा सुमारे ३०-४० लाख होणाऱ्या खर्चाने हे लोक प्रचंड त्रस्त आहेत. भाजपचे हक्काचे मतदार असलेले हेच लोक आता प्रसंगी मतदानावर बहिष्काराची भाषा बोलू लागल्याने खळबळ आहे.

शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचा पाणी, ओला कचरा, मिळकतकर, अतिक्रमणे, रस्तारुंदी, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व सोसायट्यांच्या वतीने पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन गेली सहा-सात वर्षे महापालिकेबरोबर भांडत आहे. तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकिच्या वेळी या सोसायट्यांनी कठोर भूमिका घेतली आणि `नो वॉटर नो व्होट` मोहिम राबवली. अखेर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थि केली आणि ठोस आश्वासन दिले. प्रत्यक्षात २४ बाय सात पाणी मिळणे दूर राहिले उलट दिवसाआड पाणी झाले आणि तेसुध्दा ५० टक्के घटले. राज्यकर्त्यांनी दिलेली सर्व आश्वासने खोटीच निघाल्याने आता पाणी प्रश्नावर सर्व सोसायट्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. तीन महिन्यांपूर्वीच हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने महापालिकेला नोटीस काढली पण त्यानंतरही प्रशासन थंड आहे. आता विधानसभेची पोटनिवडणूक लागल्याने हाऊसिंग फेडरेशनच्या व्हॉटस्अप ग्रुपवर पाणी प्रश्नावर सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी अत्यंत कठोर शब्दांत व्यक्त होत आहेत. कोटी कोटींचे फ्लॅट खरेदी केले, महापालिकेला १०-२० हजार रुपये मिळकतकर भरतो आणि त्यानंतरही साधे पुरेसे पाणी मिळत नसेल तर आता सरळ मतदानावर बहिष्कार टाकून यांना धडा शिकवू, अशा तीव्र प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली आहे.

१०० फ्लॅटच्या पुढे ज्या सोसायट्यांना साधारणतः जानेवारीच्या नंतर टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत होते. आता यावेळी डिसेंबरमध्येच टँकर खरेदीची वेळ आली आहे. एका सोसायटीला सरासरी ८ ते १० टँकर पाणी रोज खरेदी करावे लागले. १० हजार लिटरच्या एका टँकरचा सरासरी दर ९०० रुपये ते हजार रुपये आहे. त्याप्रमाणे साधारणतः ५००० सोसायट्यांना दर महा साधारण ३० ते ४० लाख रुपयेंचा नाहक भुर्दंड पडतो. शहराची ३० लाख लोकसंख्या विचार घेतली तर दैनंदिन १७० लिटर माणसी रोजचे पाणी मिळायला पाहिजे. प्रत्यक्षात ५०० एमएलडी पाणी महापालिका उचलते तेच खूप होते. कारण गेली दहा वर्षे ४० टक्के पाणी गळतीचे कारण सांगितले जाते, पण त्यात आजवर दुरुस्ती नाही. टँकर लॉबी, काही नेते मंडळी आणि प्रशासन मिळून या मुद्यावर नागरिकांच्या भावनेशी खेळत असल्याने हाऊसिंग सोसायट्या संतापल्या आहेत.

चिंचवड विधानसभेला ५ लाख ६६ हजार मतदारांपैकी तब्बल सुमारे तीन लाख सोसायट्यांचा मतदार आहे. उच्चशिक्षित हा मतदार मोदी-फडणवीस यांच्याकडे पाहून भाजपला मत देत आला म्हणून सलग तीनवेळा भाजपचे आमदार विजयी झाले. लोकसभा आणि महापालिकेला सुध्दा या मतदारांचा कौल भाजपच्या बाजुने असतो. आता पिण्याच्या पाणी मुद्यावर मात्र सर्व एक झाले असून यावेळी प्रसंगी पुन्हा `नो वॉटर नो व्होट` हे कँम्पेन राबवायचे अशा विचाराप्रत आले आहेत. राज्यात आणि महापालिकेतही भाजपची सत्ता असताना तत्कालिन मंत्री, आमदार, महापौर यांनी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात त्याची एक टक्काही पूर्तता नसल्याने मतदार नाराज आहे.
भाजपच्या नेत्यांकडे या प्रश्नावर समाधआनकारक उत्तर नाही आणि पूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा जाब आता हाच मतदार विचारत आहे. त्यात भाजपची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र आहे.

नेहमी येतो पावसाळा, धरणे वाहतात ओसंडून, नंतर सुरू होतो हिवाळा आणि उन्हाळा आणि मग पाणी वाहते भरभरून टँकर मधून आणि वृत्तपत्रात रकाने भरभरून😜😅🤣पण pipe मधून काही कित्येक वर्षांपासून पाणी काही वहात नाही फक्त सोसायटी धारकांच्या डोळ्यातुन मात्र उन्हाळा सुरू झाला की पाणी वाहायला सुरुवात होते, टँकर वरील खर्च पाहून.🙏🏻😥