पुन्हा भारत पाकिस्तानवर वरचढ ठरला ! 20-20 महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचा जोरदार विजय

0
410

केप टाऊन, दि. १३ (पीसीबी) – जेमिमा रॉड्रिग्जचे (३८ चेंडूंत नाबाद ५३) अर्धशतक आणि रिचा घोष (२० चेंडूंत नाबाद ३१) आक्रमक खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सात गडी आणि सहा चेंडू राखून विजय नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळविण्याची मालिका भारतीय महिला संघानेही कायम राखली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १४९ धावा केल्या. भारतीय महिलांनी १९ षटकांत ३ बाद १५१ धावा केल्या. मुंबईच्या जेमिमाने अर्धशतकाने संघाच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली. आव्हानाचा पाठलाग करताना भारताला यास्तिका भाटिया आणि शफाली वर्मा यांनी वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, यास्तिका १७ धावांवर बाद झाली. शफाली आणि जेमिमा यांनी त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत २२ चेंडूंतच २७ धावांची भर घातली. पण, शफाली (३३) बाद झाली. कर्णधार हरमनप्रीतला (१६) अधिक काळ मैदानावर टिकाव धरता आला नाही.

पण, आक्रमक फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रिचाने जेमिमाला सुरेख साथ दिली. रिचा-जेमिमा जोडीने चौथ्या गडय़ासाठी ३३ चेंडूंतच ५८ धावांची नाबाद भागीदारी करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जेमिमाने आपल्या खेळीत ८ चौकार लगावले तर, रिचाने पाच चौकारांची आतषबाजी केली.त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला कर्णधार बिस्मा मारुफ आणि आयेशा नसीम यांच्यामध्ये पाचव्या गडय़ासाठी झालेल्या ८१ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली. पाकिस्तानने चार फलंदाज ६८ धावांत गमावल्या. तरीही, त्यांची धावांची गती सहाच्या जवळपास राहिली होती. त्यानंतर मारुफ आणि नसीम यांनी आक्रमक खेळ केला. अखेरच्या चार षटकांत पाकिस्तानी जोडीला मोठे फटके न मारता आल्यामुळे त्यांची धावसंख्या मर्यादित राहिली. मारुफने ५५ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ६८, तर नसीमने २५ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४३ धावांचे योगदान दिले. भारताकडून राधा यादवने २१ धावांत दोन बळी मिळवले. राधाला दीप्ती शर्मा (१/३९) आणि पूजा वष्टद्धr(२२९कार (१/३०) यांनी चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : २० षटकांत ४ बाद १४९ (बिस्मा मारुफ नाबाद ६८, आयेशा नसीम नाबाद ४३; राधा यादव २/२१) पराभूत वि. भारत : १९ षटकांत ३ बाद १५१ (जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद ५३,शफाली वर्मा ३३, रिचा घोष नाबाद ३१; नश्रा संधू २/१५)