`आप` ची चिंचवडमधून मारुती भापकर यांना `ऑफर`

0
573

– कलाटे यांचे नाव निश्चित केल्याने राष्ट्रवादीतून बंडाचा इशारा

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिसाठी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे, भाऊसाहेब भोईर हे प्रबेळ दावेदार आहेत, पण आयत्यावेळी सर्वात तगडे नाव म्हणून शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्या नावाची घोषणा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कलाटे यांचे नाव सर्व बातम्यांतून पुढे आल्यामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता परसली असून प्रसंगी बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या स्पर्धेत आता अरविंद केजरीवाल यांच्या आप कडून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना थेट दिल्लीतून ऑफर आल्याने खळबळ आहे.

पोटनिवडणुकिसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असून मतदान २७ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी २ मार्चलो होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत अवघे तीन दिवस असल्याने आता इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. कधी नव्हे इतक्या म्हणजे ९७ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने रंगत वाढली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या सोमवारी दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाआघाडीचे नाव आज किंव उद्या जाहीर होणार असून तो अर्जसुध्दा सोमवारीच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

…तर नाना काटे बंडखोरी करणार –

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकिसाठी चिंचवडची पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने भाजप विरोधात सर्व विरोधकांचा मिळून एकच उमेदवार असावा असा अजित पवार, संजय राऊत, नाना पटोले यांच्या प्रयत्न आहे. या स्पर्धेत आणखी काही बलाढ्य नावे आयत्यावेळी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाआघाडी म्हणून राष्ट्रवादीच्याच निष्ठावंताला संधी द्यावी, कलाटे यांचे नाव जाहीर केले तर प्रसंगी नाना काटे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजले. शिवसेनेचे राहुल कलाटे सोडून राष्ट्रवादीमधूनच नाना काटे, भोईर, मयूर कलाटे यापैकी एकाला संधी द्यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्याकडे केल्याने अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, उमेदवारांच्या स्पर्धेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आप कडूनही आता चाचपणी सुरू असून पूर्वाश्रमिचे आपचे खंदे कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना विचारणा कऱण्यात आली आहे. नवी दिल्ली येथून आपचे दोन वरिष्ठ नेते केजरीवाल यांचा निरोप घेऊन भापकर यांच्या भेटीला शुक्रवारी आले होते. स्वतः भापकर यांनी अदयाप त्याबाबत आपले मत कळविलेले नाही. भाजप विरोधात ताकदिचे उमेदवार देण्याचा आपचा प्रयत्न असून भापकर यांच्यासह महापालिकेचे निवृत्त अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या नावावरसुध्दा चर्चा सुरू असल्याचे समजले.