पाऊण किलोहून अधिकचे बनावट सोन तारण ठेवून घेतले २७ लाखांचे कर्ज

0
278

निगडी, दि. ४ (पीसीबी) – तिघांनी मिळून ८१३ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेऊन २७ लाख ८० हजार १०० रुपये घेतले. सोने बनावट असल्याचे समजल्यानंतर सोने तारण घेणाऱ्या कंपनीने पैशांची मागणी केली. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार १९ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२२ या कालावधीत निगडी येथे घडला.

हिमगिरी हायर पर्चेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राजमल जैन (वय ५२) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष भागवत बागल (वय ४०, रा. किवळे), राहुल भीमाप्पा बालीगर (वय ४०, रा. देहूरोड), सुनील काशिनाथ वाघमारे (वय ४७, रा. किवळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमगिरी हायर पर्चेस लिमिटेड ही कंपनी सोने तारण घेऊन कर्ज देण्याचे काम करते. आरोपींनी ८१३.७ ग्रॅम वजनाचे बनावट सोने आणले. सोने खरेदीच्या खोट्या पावत्या दाखवून जैन यांच्या कंपनीकडून २७ लाख ८० हजार १०० रुपये सोने तारण कर्ज आरोपींनी घेतले. घेतलेले कर्ज परत न करता कंपनीची फसवणूक केली. तसेच कर्जाची रक्कम मागितली असता संतोष बागल याने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संतोष बागल आणि सुनील वाघमारे या दोघांना अटक केली आहे.