पुणे दि. २३ पीसीब – अखेर शेतकऱ्यांच्या आसूडासमोर सरकार नमले आणि कांद्यावर लादलेले निर्यात शुल्क एक एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, या निर्णयाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वागत केले. काल महात्मा फुले यांची पगडी घालून लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांचा जोरदार आसूड उगारताना मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली की, केंद्र सरकार निर्यात शुल्क व निर्यातबंदी सारखे मनमानी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम गेली काही वर्षे करीत होतं. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात संसदेत सातत्याने आवाज उठवीत निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी सातत्याने करीत होतो. कालही लोकसभेत निर्यात शुल्क कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी केली होती, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
डॉ. कोल्हे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत केंद्र सरकारने १ एप्रिलपासून २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे मी स्वागत करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने मी सरकारचे आभार व्यक्त करतो, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. त्याचबरोबर सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही सकारात्मक करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पंतप्रधानांनी केलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचीही अंमलबजावणी करावी, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.














































