संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

PCB Admin
4 Min Read

पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच होत असलेल्या संविधान दौडला शहरवासियांनी,लोकप्रतिनिधींनी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद…

*पिंपरी, दि. २६ नोव्हेंबर २०२६ :- * भारतीय संविधानाप्रती आदर, लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी आणि संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संविधान सन्मान दौड २०२६’ उत्साहात संपन्न झाली.

या संविधान दौडमध्ये महापौर रवि लांडगे यांच्यासह आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी तसेच कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांच्यासह प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे,निखिल बो-हाडे,आरती चौधे, सविता खुळे, नगरसदस्य शत्रुघ्न बापू काटे, तुषार हिंगे, बाबासाहेब त्रिभुवन,कुणाल वाव्हळकर,सुरेश भोईर, धर्मपाल तंतरपाळे, माऊली जगताप, विशाल कलाटे, डाॅ.सुहास कांबळे, शामराव जगताप, जगन्नाथ काटे, नगरसदस्या सुलभा उबाळे, शैलजा मोरे, मनिषा भोईर,नीता पाडळे,सारिका गायकवाड, सारिका मासुळकर, पल्लवी जगताप, रेश्मा भुजबळ,स्नेहा कलाटे, शालिनीताई गुजर सहभागी झाले होते.
तसेच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहआयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संविधान सन्मान दौडची सुरूवात चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व थोर क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनानी झाली त्यानंतर देशभक्तीपर गीताने कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले होते.
महापौर रवि लांडगे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत फ्लॅग ऑफ करून संविधान सन्मान दौडीला हिरवा झेंडा दाखविला. या दौडीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संविधानाच्या विचारांचा जागर केला. भीमसृष्टी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून दौडीचा समारोप करण्यात आला.संविधान प्रास्ताविकेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच होत असलेल्या संविधान दौडला शहरवासियांनी,लोकप्रतिनिधींनी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे सांगून प्रत्येक नागरिकाने संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी योगदान द्यावे, संविधानाचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे. संविधानाच्या विचारांचा जागर आणि संदेश देणाऱ्या या दौडीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

  भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही अमूल्य तत्त्वे दिली आहेत. ही मूल्ये केवळ संविधानापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या अंगिकारणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आमदार शंकर जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाविषयी जनजागृती करण्याबरोबरच “पाणी वाचवा भविष्य घडवा” तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर, हरित आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड शहर घडविण्याचा संकल्पही करण्यात आला. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि संविधानाच्या मूल्यांप्रती व्यक्त झालेली बांधिलकी यामुळे ‘संविधान सन्मान दौड २०२६’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share This Article