पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरातील विविध क्रिकेट क्लब, ॲकॅडमी यांचे सहभागी होणार असून ही स्पर्धा हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेट खेळाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक क्रिकेट क्लब, ॲकॅडमीतील नवोदित आणि युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिध्द करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संघटनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये विजेता, उपविजेता संघ तसेच वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी कळवले आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी तिसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग’ टी-२० या भव्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त होणार आहे.
या स्पर्धेत नाव-नोंदणीसाठीची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२६ आहे. इच्छुक क्लबनी त्यापुर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क संघटनेचे सचिव राजू कोतवाल ९९२२५०२४१४ किंवा सुशील जाधव ९९२३२३१२१८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

