चिंचवड: विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात १७ ऑक्टोबर रोजी ही परिषद होणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या परिषदेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजन समितीत प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला आंदुरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे तसेच पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक लक्ष्मीकांता माने यांचा समावेश आहे.
व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील नामांकित भिक्खुनी तसेच विविध क्षेत्रांतील गाढे अभ्यासक या परिषदेत वक्ते आणि चर्चासत्रातील सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत.
इ.स. १९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने ‘All India Depressed Classes Women’s Conference’ या ऐतिहासिक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे झालेल्या या परिषदेत महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांवर विचारमंथन करण्यात आले. त्याच ऐतिहासिक परंपरेपासून प्रेरणा घेत, पुण्यात प्रथमच अशा स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे आयोजन महिलांनी केले असून, वक्त्यांमध्येही महिलांचा प्रमुख सहभाग आहे. मात्र, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रथम www.thewisdominmotion.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
या परिषदेत भिक्खुनी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या बौद्ध महिलांच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात येणार आहे. बौद्ध महिलांचे योगदान, नेतृत्व, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समकालीन आव्हाने यांवरही विविध सत्रांमध्ये चर्चा होणार आहे.
“भिक्खुनी संघाविषयीची बुद्धांची कालातीत दृष्टी तसेच समानता आणि सामाजिक न्यायाप्रती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कटिबद्धता यांपासून प्रेरणा घेऊन ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. भिक्खू-भिक्खुनी, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि समाजनेते यांना एका व्यासपीठावर आणणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
प्रत्येक संवादात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असते, असा आमचा विश्वास आहे. ‘विस्डम इन मोशन फोरम’ अशा एका जागतिक समुदायाची निर्मिती करू इच्छिते, जिथे ज्ञानाचे आदान-प्रदान परिषदेच्या कक्षांच्या पलीकडे जाऊन विस्तारेल आणि विविध पिढ्यांमधील संवादाला प्रोत्साहन मिळेल,” अशी माहिती आयोजकांनी दिली.
२,६०० वर्षांहून अधिक काळापूर्वी भिक्खुनी संघाची स्थापना करून बुद्धांनी स्त्रियांनाही धम्माचा मार्ग खुला केला. याद्वारे स्त्रियांची प्रज्ञा, नेतृत्व आणि मुक्ती प्राप्त करण्याची क्षमता अधोरेखित झाली. या कालातीत दृष्टिकोनातून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानता, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ ही संवाद, अध्ययन आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेबाबत अधिक माहितीसाठी ७८८८१२९१६९ आणि ८९७५७३८६३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
१७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद

