शहरातील स्मशानभूमींना भेटी देत केली समस्यांची चिरफाड..
निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड, देहूरोड स्मशानभूमींची मरनासन्न अवस्था..
पाहणी दौऱ्यात विदारक चित्र निदर्शनास; प्रशासनाच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह?…
पिंपरी, ता. 8 ः मृत्यूनंतर अंत्यविधी करताना पुरेशा सुविधा देण्यात महापालिकेने कुचराई केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड आणि देहूरोड स्मशानभूमींमध्ये मृतदेहाची चक्क हेळसांड होत असल्याचे माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. स्मशानभूमींची गळकी छते, पिण्याच्या पाण्याचा अभाव, दुरवस्थेतील स्वच्छतागृहे, सुरक्षा साधनांची कमतरता, अस्वच्छता आणि अपुरी प्रकाशव्यवस्था अशा मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमीतील गैरसोयींबाबत नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. नगरसेविका शैलजा मोरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेचा मुद्दा ठामपणे उपस्थित करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. मात्र, या गंभीर प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मोरे यांनी केवळ सभागृहात प्रश्न उपस्थित न करता थेट समस्यांच्या मुळाशी जाऊन वस्तुस्थिती उजेडात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज मंगळवार (दि. ०८) पासून शहरातील स्मशानभूमींचा प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. दिवसभरात निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड आणि देहूरोड येथील स्मशानभूमींना भेट देत त्यांनी तेथील दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी वेळी संबंधित प्रभागातील नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित होते.
नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतलेल्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. स्मशानभूमींमध्ये तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मिळावी, यासाठी मोरे यांनी प्रशासनाला जाब विचारला.
शहरातील या स्मशानभूमींना दिल्या भेटी…
निगडी : विद्युत दाहिनीपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच प्रश्न गंभीर…
निगडी स्मशानभूमीतील शवदाहिनीचा छत गळतो, सुरक्षा भिंत नाही, जनरेटरजवळ पाणी साचते, पेव्हिंग ब्लॉक नाहीत, अस्थी ठेवण्यासाठी कलश नाही, तर पाईप फुटलेला आहे. परिसरात कचरा साचलेला आहे. बॉयलरचा मोठा आवाज येतो. गार्डनमध्ये पेव्हिंग ब्लॉक आणि बसण्याची सुविधा नाही. विद्युत दाहिनीतील एका ट्रॉलीवरून मृतदेह खाली पडण्याचा धोका आहे. फुटलेल्या खिडक्यातून पावसाचे पाणी येते. स्लॅबला गळती लागली आहे. नैवेद्य ठेवण्याचा ओटा खराब आहे. पाण्याचे फिल्टर जुने आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. तब्बल २६ वर्षे काम करूनही कर्मचारी कायमस्वरूपी नाहीत. पगारवाढ नाही, ग्रॅच्युईटी लाभ नाही, कर्मचारी संख्यावाढ नाही. कर्मचाऱ्यांना खाकी गणवेश, मास्क आणि आवश्यक सुरक्षा किट दिल्या नाहीत. मृतदेहांवर अंतिम संस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष केले आहे, असे मोरे यांनी सांगितले.
किवळे : नदीकाठच्या स्मशानभूमीची अवस्था बिकट…
किवळे येथील स्मशानभूमीत स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम नाही. जाळण्यासाठी आवश्यक जाळण्यांची कमतरता आहे. अपुरे शेड, वेळेवर न येणारी कचरा गाडी, सभामंडप, स्पीकर, माईक आणि प्रकाशव्यवथा नाही. पिण्याचे पाणी नाही. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन नाही. परिसरात गवत वाढलेले आहे. स्मशानभूमीची जागा खासगी मालकीची आहे. नैवेद्य ठेवण्याची जागा नीट नाही. पत्राशेड वाकले आहे. नदीच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक नाहीत. महादेव मंदिर उघड्यावर आहे. विसाव्याची जागा अपुरी असून तिची उंची वाढविण्याची मागणी आहे. ड्रेनेज लाईन नदीत सोडली आहे. सुरक्षा किट नाही. रस्त्यालगत वाढलेले गवत आणि साचलेला कचरा यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना साधे स्वच्छतागृह आणि पिण्याचे पाणीही मिळू नये, ही महापालिका प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची खंत मोरे यांनी व्यक्त केली.
मामुर्डी : स्मशानभूमी की दारूचा अड्डा?…
मामुर्डी स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांची कमतरता, सभामंडपाच्या छताला गळती, रस्ता आणि पुलाचा खांब सभामंडपाच्या जागेत आहे. लाईट, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची सुविधा अपुरी आहे. नदीकाठच्या पायऱ्यांवर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ग्रील नाही. विशेष म्हणजे गणेश विसर्जन घाट आणि स्मशानभूमी एकाच ठिकाणी असल्याने तेथे दारू पिणारे लोक बसत असल्याचेही निदर्शनास आले. शौचालयाची दुरवस्था असून जाळ्यांची कमतरता आहे. जाळीचे सभागृहही अपुरे पडत आहे. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पाहणीवेळी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे उपस्थित होते.
चिंचवड-केशवनगर : विधीनंतर नागरिकांची उघड्यावर अंघोळ…
चिंचवड, केशवनगर येथील विद्युत दाहिनी परिसरात पेव्हिंग ब्लॉक बाजूला काढून ठेवले आहेत. स्वच्छतागृह नादुरुस्त असून विसाव्यासाठी शेड नाही. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी नाही. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांसाठी केबिन नाही. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बाथरूम नाहीत. पायऱ्यांना सुरक्षा ग्रील नसून स्वच्छतेचा अभाव असल्याने ठिकठिकाणी कचरा साचला आहे. परिसरात पंखे नाहीत, प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नाही. विधीनंतर नागरिक उघड्यावर अंघोळ करतात. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर नाहीत. कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी रजिस्टर ठेवण्याची गरज आहे. या वेळी नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित होते.
देहूरोड-शितळानगर : लाखो रुपयांचे वीजबिल थकीत; विद्युत दाहिनी बंद…
देहूरोड, शितळानगर येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत दाहिनीचे तब्बल ८ लाख ५० हजार ३६० रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने ही सुविधा बंद आहे. स्मशानभूमीत कर्मचारी नाहीत, सुरक्षा रक्षकही नाहीत. त्यामुळे अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मृत्यूनंतरच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या सुविधाही महापालिका प्रशासनाला सुरळीत ठेवता येत नसतील, तर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
—– कोट—-
”शहरातील विविध स्मशानभूमींची पाहणी करताना समोर आलेल्या समस्या केवळ किरकोळ दुरुस्तीच्या नसून त्या नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाशी संबंधित आहेत. त्यामुळे पाहणी दौरा केवळ पाहणीपुरता मर्यादित न ठेवता प्रशासनाने प्रत्येक स्मशानभूमीतील समस्यांची तातडीने नोंद घेऊन कालबद्ध पद्धतीने दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.”
- शैलजाताई मोरे, माजी उपमहापौर तथा नगरसेविका, प्रभाग क्रमांक १५…

