वारकऱ्यांच्या मसाज सेवेचा योग विद्या धामचा विश्वविक्रमवर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया दखल ; मोशी येथे प्रमाणपत्र वितरण

bpcauthor
5 Min Read

पिंपरी , दि. १० : योग विद्या धाम या संस्थेच्या पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने दिवे घाट जवळील झेंडेवाडी येथे सुमारे ३२६४ वारकऱ्यांच्या पायाची मसाज सेवा करण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने मसाज सेवा करण्याचा हा विश्वविक्रम झाला. या विश्वविक्रम दखल मुंबई येथील ‘ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया ‘ या संस्थेने घेतली असून मोशी येथील कार्यक्रमात रविवारी (ता. ९) याच्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात झाला.

आषाढी वारीनिमित्त आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करणाऱ्या सुमारे चार ते पाच हजार वारकऱ्यांच्या पायाची मसाज करण्याचा गेली १५ वर्षे उपक्रम राबविणाऱ्या योग विद्या धाम या संस्थेच्या पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने राबविण्यात येतो. यंदा प्रथमच हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे योग्य विद्या धाम या संस्थेच्या पिंपरी – चिंचवड शाखेने ठरविले होते. त्यानुसार या उपक्रमाची ‘ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया ‘ या संस्थेला माहिती कळविण्यात आली होती. त्यानुसार ‘ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया ‘ या संस्थेचे प्रतिनिधी झेंडेवाडी येथे ११ जुलै या उपक्रमाच्या दिवशी घटनास्थळी उपस्थित होते.
अत्यंत बारकाईने ‘ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया ‘ या संस्थेच्या प्रतिनिधींनी पाहणी करून हे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे जाहीर केले. वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र ‘ योग विद्या धाम पिंपरी चिंचवड शाखा ‘ या संस्थेला प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी (ता. ९) अभिषेक इंटरनॅशनल स्कुल येथे झाला. ‘ वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया ‘ या संस्थेचे संचालक सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आणि तसे जाहीरही करण्यात आले. योग विद्या धाम या संस्थेच्या पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी अभिषेक इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका गीता चरंतीमठ आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सूर्यकांत केकाणे यांच्या हस्ते ज्या साधकांनी मसाज सेवा केली त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मसाजसेवेच्या या उपक्रमात ९१ महिला आणि ७० पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला आणि पुरुष कार्यकर्ते मिळून १६१ जणांनी ३२६४ वारकऱ्यांच्या पायाची मसाज सेवा केली.

यावेळी सूर्यकांत केकाणे म्हणाले, ” आपण वारकऱ्यांना जी मसाज सेवा देत आहात ती खरोखरीत स्तुत्य आहे. मी वारीमध्ये विविध ठिकाणी जात असतो. वारकऱ्यांच्या पायांची मसाज सेवा ही अत्यंत गरजेची आणि पांडुरंगाच्या भक्ती निरपेक्ष सेवा आहे. मसाज करताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भावच सांगत असतात की त्यांना किती सुख आणि आराम लाभतो आहे. ”

वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाचे संचालक सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर म्हणाले, ” योग विद्या धाम संस्थेच्या या वारकऱ्यांच्या पायाची मसाज सेवा या उपक्रमाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ११ जुलै रोजी समक्ष उपस्थित राहून या उपक्रमाचे आम्ही पूर्णवेळ परीक्षण केले. योग्य परीक्षण करून रेकॉर्ड संपन्न झाल्याचा निर्णय देणे, हे आमचे मुख्य काम आहे. आम्ही आज पर्यंत अनेक वेगवेगळ्या क्रमांचे परीक्षण केलेले आहे. मात्र या कार्यक्रमांमध्ये आम्हाला सुद्धा विशेष आनंद मिळाला आम्ही सुद्धा विठ्ठल भक्तीने भारावून गेलो. ”

अभिषेक इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका गीता चरंतीमठ म्हणाल्या, ” या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आमच्या स्कूलमध्ये झाला, याचा आम्हाला अभिमान आहे. योगविद्याधामच्या पुढील अनेक उपक्रमांसाठीसुद्धा आम्ही आनंदाने सहकार्य देऊ.. ”

योग विद्या धाम पिंपरी चिंचवड केंद्राचे केंद्रप्रमुख योगाचार्य प्रमोद निफाडकर, म्हणाले, ” व्यायाम म्हणून अनेक जण अर्धा एक तास पायी चालतात. परंतु तेवढ्यानेही आपण थकून जातो. मग हे वारकऱ्यांना ३५० किमी कसे चालत असतील, त्यांना किती थकवा येत असेल, या जाणिवेतूनच हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. गेली पंधरा वर्षे १०० ते १२५ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तीन ते चार हजार वारकऱ्यांच्या पायाची मसाज सेवा होत आहे. वारकऱ्यांच्या पायांची सेवा करताना आम्हाला सर्वांनाच खरोखरीच विठ्ठलाचे दर्शन होते आणि याचाच आम्हाला खूप आनंद आहे. वारकऱ्यांची सेवा करणे हाच आमचा मुख्य उद्दिष्ट आहे. वर्ल्ड रेकॉर्ड करणे हा आमचा उद्देश नव्हता. सेवा करता करता ते अगदी सहज होऊन गेला. त्याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद ! ”

यावेळी विश्वविक्रमी कलाकार नरेंद्र धायगुडे यांनी शंखाद्वारे पसायदान सादर केले. योगिता तरडे यांच्या ग्रुपने योगासनांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. ऐश्वर्या जोशी यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कडू , प्रवीण महादर, मल्लिकार्जुन उडगी, , कल्पना सुतार, पूनम नेवे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

Share This Article