- सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, उद्योजक दिनेश मोरे आणि नगरसेवक तुषार हिंगे यांच्यावतीने आयोजन
पिंपरी-चिंचवड: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे सुपुत्र आणि जनमानसात वेगळे स्थान निर्माण केलेले लोकनेते राजेंद्र राऊत यांची नुकतीच महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार पदी निवड झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सोलापूरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या सत्कारासाठी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पिंपरी-चिंचवड व पुणे शहर यांच्या वतीने, तसेच उद्योजक दिनेश मोरे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्या पुढाकाराने व आयोजनातून, आमदार राजेंद्र राऊत यांचा ‘भव्य नागरी सत्कार’ सोहळा संपन्न होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या समस्त सोलापूरवासीयांच्या वतीने आयोजित या सत्काराच्या माध्यमातून लाडक्या नेत्याच्या निवडीचा आनंद साजरा केला जाणार आहे.
हा सत्कार सोहळा रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, सीझन्स बॅंक्वेट हॉल, दुर्गा चौक, यमुना नगर, निगडी येथे पार पडणार आहे.
या सत्कार सोहळ्यास राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या गौरव सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी सर्व सोलापूरवासीयांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक दिनेश मोरे, नगरसेवक तुषार हिंगे आणि सोलापूर जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

