भोसरीत ४२ लाखांची फसवणूक; मालमत्ता विक्रीच्या बहाण्याने उद्योजकाला घातला गंडा, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

0
3

पिंपरी, दि. ६ – मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याची एक गंभीर घटना भोसरी परिसरात उघडकीस आली आहे. एका उद्योजकाला दुकान आणि गोडाऊन विकण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आणि त्यानंतर मालमत्ता नावावर न करता ४२ लाख २६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भोसरी पोलिसांनी याप्रकरणी देवेद्रसिंग हरभजनसिंग आनंद (वय ५०) आणि त्यांची पत्नी विणू देवेंद्रसिंग आनंद (वय ४५, दोन्ही रा. कासारवाडी, दापोडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विकास मानचंद गोयल (वय ४३, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी विकास गोयल यांचा ‘मास्टर फॅब’ नावाचा कारखाना असून, त्यांची आरोपी देवेंद्रसिंग यांच्याशी गेल्या ९ वर्षांपासून ओळख होती. सप्टेंबर २०१८ मध्ये आरोपींनी त्यांना भोसरी येथील ‘कुणाल पुरम’ योजनेतील एक दुकान आणि त्यासमोरील गोडाऊन विकायचे असल्याचे सांगितले. हा व्यवहार २ कोटी रुपयांना ठरला होता.
गोयल यांनी या व्यवहारापोटी सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत वेळोवेळी मोठी रक्कम आरोपींना दिली. आरोपींनी हे पैसे स्वतःच्या व्यवसायासाठी आणि बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी मालमत्ता गोयल यांच्या नावावर करून देण्यास टाळाटाळ केली. या मध्ये आजूनही अनेक जणांना या दाम्पत्यांकडून अशा प्रकारचा गंडा घातल्याची शक्यता असून पोलिस तपासात काय समोर येणार हे पाहावे लागणार आहे.