दि.०३ (पीसीबी)-देशातील लाखो नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) लवकरच ‘ई-प्राप्ती’ (E-PRAAPTI) हे नवीन डिजिटल संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून निष्क्रिय किंवा हरवलेली पीएफ खाती शोधणे आणि ती पुन्हा सुरू करणे अधिक सोपे होणार आहे.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोर्टल पूर्णपणे आधार क्रमांकावर आधारित असेल. त्यामुळे ज्यांच्याकडे युनिव्हर्सल खाते क्रमांक (यूएएन) नाही किंवा विसरला आहे, अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या जुन्या खात्यांपर्यंत पोहोचता येणार आहे. फक्त आधार क्रमांकाच्या साहाय्याने ओळख पडताळणी करून वापरकर्ते आपली माहिती अद्ययावत करू शकतील.
सध्या अनेक कर्मचाऱ्यांची जुनी पीएफ खाती वेगवेगळ्या नियोक्त्यांकडे विखुरलेली असतात किंवा दीर्घकाळ व्यवहार न झाल्यामुळे निष्क्रिय होतात. अशा खात्यांचा मागोवा घेण्यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे, कार्यालयीन फेऱ्या आणि वेळ खर्च करावा लागत होता. मात्र ‘ई-प्राप्ती’ पोर्टलमुळे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि सुलभ होणार आहे.
या नव्या सुविधेमुळे पीएफ खाते शोधणे, ते सक्रिय करणे, एकत्रित करणे (मर्ज), नामनिर्देशन अद्ययावत करणे आणि रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होणार आहे. विशेष म्हणजे, वारसदारांनाही या पोर्टलच्या माध्यमातून अडकलेला निधी मिळवणे शक्य होणार आहे.
कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, सुरुवातीला ही सेवा सदस्य ओळख क्रमांक (मेंबर आयडी) असलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात ज्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, अशांनाही या सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
या डिजिटल उपक्रमामुळे पीएफ कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज कमी होईल, कागदपत्रांचा जंजाळ संपेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनेल. अनेक वर्षांपासून अडकलेली रक्कम मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने नोकरदार वर्गासाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार आहे.












































