शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे वाटप करत केला निषेध
पिंपरी, दि.२४(पीसीबी) – आयुष्यभर कामगार, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे कॉ. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना थेट फोनवरून अर्वाच्च शब्दात शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. हि ऑडिओ सर्वत्र व्हायरल होत असून महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे वितरण करून या पुस्तकाचे समर्थन करण्यात आले.
नखाते म्हणाले की, आ.संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. कॅन्टीन मधल्या कामगारांना मारहाण करणे, दमदाट्या करणे यामध्ये ते प्रसिद्ध होण्यासाठी आटापिटा करत असतात. प्रकाशक आंबी हे एकदा पुस्तक वाचा असे म्हणत अत्यंत संयमी भाषेमधून बोलत असताना त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करणे हे अत्यंत चुकीचे आहे. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाची विक्री खूप मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे.
संजय गायकवाड यांनी पुस्तकावर आक्षेप असल्यास विधानसभेचे सदस्य असताना त्यांनी रीतसर मागणी करणे सभागृहात बोलणे महत्वाचे आहे. मात्र अशा पद्धतीने टवाळखोर पोरासारखी भाषा वापरणे अत्यंत निंदनीय असून मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करून त्यांना लगाम घालावा अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले आहे.
यावेळी उपाध्यक्ष राजेश माने,सचिव तुषार घाटुळे,मनपा सदस्य राजू बिराजदार, राजेंद्र भंडारी, लाला राठोड, चंद्रकांत माळी,नितीन जाधव,सतीश जाधव,बाळू शेळवणे,सुनील वायकुळे,कैलास सोनटक्के,प्रकाश वारंग आदी उपस्थित होते.











































