फेक इन्फ्लुएन्सर आणि कोट्यवधींची कमाई!
न्यूयॉर्क/नवी दिल्ली: तंत्रज्ञानाचा वापर करून जग कसं फसवता येतं, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. ‘सॅम’ नावाच्या एका भारतीय विद्यार्थ्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून अमेरिकेतील हजारो राजकीय समर्थकांना अक्षरशः वेड लावले. ‘एमिली हार्ट’ नावाची एक सुंदर तरुणी प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती, तरीही तिने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.
सॅम या भारतीय विद्यार्थ्याने AI टूल्सचा वापर करून ‘एमिली हार्ट’ नावाची एक काल्पनिक महिला इन्फ्लुएन्सर तयार केली. दिसायला अत्यंत देखणी आणि आकर्षक असलेल्या या ‘डिजिटल महिले’ला त्याने अमेरिकेतील ‘MAGA’ मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर समर्थकांच्या विचारधारेशी जोडले.
एमिली हार्टच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सातत्याने ट्रम्प समर्थक आणि उजव्या विचारसरणीच्या पोस्ट केल्या जात होत्या. यामुळे हजारो अमेरिकन नागरिक तिचे चाहते बनले. एमिलीचे सर्व फोटो AI द्वारे तयार केलेले होते. ती कधी अमेरिकन ध्वजासोबत तर कधी राजकीय रॅलीमध्ये असल्याचे भासवले जायचे. जेव्हा तिची लोकप्रियता शिखरावर पोहोचली, तेव्हा सॅमने ‘Fanvue’ आणि ‘OnlyFans’ सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तिचे ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांकडून पैसे आकारण्यास सुरुवात केली.
या भारतीय विद्यार्थ्याने केवळ काही महिन्यांतच हजारो डॉलर्स कमावले. जे लोक तिला खरी व्यक्ती समजून पैसे देत होते, त्यांना हे माहितच नव्हते की पडद्यामागे एक तरुण बसून AI च्या सहाय्याने त्यांना ‘मूर्ख’ बनवत आहे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. एका बाजूला भारतात सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न असताना, तरुणांनी अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून ‘सायबर फ्रॉड’चा नवा मार्ग शोधल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.














































