‘दादां’च्या स्मृतींना आणि कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी साद; पिंपरी-चिंचवडमधील बारामतीकरांचा भव्य ‘कृतज्ञता मेळावा’..

2 Min Read

दि.१७(पीसीबी)- बारामती आणि पिंपरी-चिंचवड हे केवळ दोन भौगोलिक भाग नसून ते एका अतूट नात्याने जोडलेले कुटुंब आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवाचे शिल्पकार, जनमानसातील अढळ स्थान असलेले आदरणीय स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना आगळेवेगळे अभिवादन करण्यासाठी शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे ‘कृतज्ञता मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात दादांचे योगदान शब्दातीत आहे. आज दादा जरी आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आणि सामान्यांसाठी लढण्याची जिद्द आपल्या मनात जिवंत आहे. याच भावनेतून, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या उप मुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. दादांच्या पश्चात ही लढाई केवळ राजकीय नसून, ती दादांच्या विकासाच्या परंपरेला साथ देण्याची एक भावनिक जबाबदारी आहे.

बारामती मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित या मेळाव्यात पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या सर्व बारामतीकर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि सुनेत्रावहिनींना बळ देण्यासाठी हे एकत्र येणे काळाची गरज आहे. हा राजकीय मेळावा नसून, दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करण्याची ही संधी आहे. दादांनी या शहराला वैभव दिले, आता वेळ त्यांच्या विचारांना आणि वहिनींच्या नेतृत्वाला ताकद देण्याची आहे, असे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. तसेच बारामती मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बारामतीकरांना या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

Share This Article