दि.११(पीसीबी)-छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील वैद्यकीय देयक घोटाळ्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोग्य विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी झालेल्या कथित आर्थिक देवाण-घेवाणीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘लाल वही’ विशेष चर्चेत आहे. या वहीमध्ये बिलांच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी कोणाला किती पैसे दिले, याची तारीखवार नोंद आढळून आली.८ डिसेंबर २०२५ रोजी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही वही समोर आली होती. त्यानंतर हे प्रकरण नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गाजले.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. तीन सदस्यीय समिती नेमून सखोल तपास करण्यात आला. या समितीने ५०० हून अधिक पानांचा अहवाल सादर केला.या अहवालात दोन्ही अधिकाऱ्यांना समसमान दोषी ठरवण्यात आले. त्यानुसारच त्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य इतिहासात एकाच वेळी विद्यमान आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.या कारवाईमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








































