मी महादेवाचा अवतार… तू माझी पार्वती…

2 Min Read

अध्यात्म, धर्मगुरू नावाच्या आड अनेक भोंदू महाराज महिलांचं शोषण करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशातच आणखी एक नवी घटना उघडकीस आलीय ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे आणि वसई परिसरात एका स्वयघोषित धर्मगुरूने अध्यात्माच्या नावाखाली महिलेची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वतःला ‘महादेवाचा अवतार’ म्हणत आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात ऋषिकेश वैद्य या तथाकथित महाराजाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ३५ वर्षीय पीडित महिला आरोपीच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून आली होती. ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगत त्याने तिच्यावर मानसिक प्रभाव टाकला आणि पुण्यातील मांजरी परिसरात तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, घटना पुण्यात घडल्याने तपास मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माहितीनुसार, आरोपीने महिलेचे ब्लॅकमेलिंग करत तिला संपर्कात ठेवले आणि नंतर वसईतही तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. २०२३ पासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडितेला संपूर्ण प्रकाराची जाणीव झाल्यानंतर तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

घटना पुण्यात घडल्यामुळे तपास मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देत सांगितले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि विविध जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, श्रद्धेच्या नावाखाली कोणी फसवणूक किंवा चुकीचे कृत्य करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article