मीना शिंदे काव्यदीप पुरस्काराने सन्मानित

0
3

पिंपरी, दि. २७ – पिंपरी – चिंचवड येथील ज्येष्ठ कवयित्री आणि गझलकारा मीना शिंदे यांना गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या; तसेच साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रास्ताविकातून
ज्योत्स्ना चांदगुडे यांनी, ‘मीना शिंदे सुमारे पस्तीस वर्षांपासून आशयघन कविता आणि गझल लिहीत आहेत. त्या कवितांच्या सन्मानार्थ ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ प्रदान करून त्यांना सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे!’ अशी भावना व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मीना शिंदे यांनी आपल्या मनोगतातून, ‘पुण्यातील अतिशय नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित अशा साहित्यदीप प्रतिष्ठानकडून आणि माझ्या आवडत्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते काव्यदीप पुरस्काराने मला गौरविण्यात आले याचा मनस्वी आनंद वाटतो. कवितेचे विविध प्रकार हाताळत असताना मी गझलेतही विविध प्रयोग केले. या प्रयत्नांची वेळोवेळी दखल घेतली गेली याविषयी समाधान वाटत असलेतरी काव्यक्षेत्रात मला अजून बरेच मैलांचे दगड मला पार करायचे आहेत!’ अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. अंजली कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘गझलकारा मीना शिंदे यांना मिळालेला साहित्यदीपचा काव्यदीप पुरस्कार हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार असून त्यासाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. उत्तम शब्दकळा, सकारात्मक विचार, समृद्ध आशय आणि तंत्रशुद्ध कलाकुसर यांचा सुंदर समन्वय त्यांच्या रचनांमध्ये आढळतो!’ असे गौरवोद्गार काढले.

पुरस्कार सोहळ्यानंतर दुसर्‍या सत्रात ‘स्पंदन’ या निमंत्रितांच्या महिला कविसंमेलनात ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, मीरा शिंदे, मृणालिनी कानिटकर, प्राजक्ता वेदपाठक, चिन्मयी चिटणीस, ललिता सबनीस, मृदुला कुलकर्णी – खैरनार, सविता इंगळे, तरूजा भोसले, रेखा येळंबकर, शीला टाकळकर, राजश्री सोले आणि मीना शिंदे यांनी स्त्रीजाणिवांच्या स्वरचित कवितांचे अप्रतिम सादरीकरण केले. निरूपमा महाजन यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले; तर ऋचा कर्वे यांनी पुरस्कार सोहळ्याचे निवेदन केले. प्रतिभा पवार यांनी आभार मानले.