ओम प्रतिष्ठानमध्ये हेरंब कुलकर्णी यांची प्रेरणादायी भेट

0
3

चिंचवड : प्रख्यात लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ओम प्रतिष्ठानला नुकतीच प्रेरणादायी भेट दिली. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कुलकर्णी यांनी या भेटीदरम्यान संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी आयोजित विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रवास, अनुभवांतून घेतलेले धडे तसेच समाजासाठीची भावी दिशा याविषयी मनमोकळेपणाने विचार मांडले. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ओम प्रतिष्ठान व हेरंब कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच एकल महिलांसाठी विविध उपयुक्त व परिणामकारक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांमुळे महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी ओम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी आगामी उपक्रमांविषयी माहिती देत, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेअंतर्गत एका लाभार्थी विद्यार्थिनीला धनादेश (चेक) प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सर यांच्या हस्ते विद्यार्थिनीला चेक प्रदान करण्यात आला.

दरम्यान, या भेटीदरम्यान घेतलेली प्रेरणादायी मुलाखत लवकरच प्रसारित होणार असून, समाजातील नागरिकांनी ती पाहून या सकारात्मक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन ओम प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.