आंळंदीत ‘आध्यात्मिक’ शिक्षण संस्थेत बालकांचे लैंगिक, शारीरिक आणि मानसिक शोषण

PCB Admin
2 Min Read

दि.१३(पीसीबी) – तीर्थक्षेत्र आळंदी येथील खंडोबा मंदिर परिसरातून हादरवणारी घटना समोर आली आहे. इथे सुरू असलेल्या एका ‘आध्यात्मिक’ शिक्षण संस्थेत बालकांचे लैंगिक, शारीरिक आणि मानसिक शोषण होत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अनधिकृत संस्थेवर धाड टाकून प्रशासनाने २१ निरागस मुलांची क्रूरतेच्या विळख्यातून सुटका केली आहे.

‘चिल्ड्रन हेल्पलाईन १०९८’ वर मिळालेल्या एका गोपनीय तक्रारीवरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांनी या संस्थेवर धडक कारवाई केली. तपासणी दरम्यान, एका १३ वर्षीय मुलाच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर खुणा दिसून आल्या, ज्यातून या ‘महाराजांच्या’ अमानवीय कृत्यांचा पर्दाफाश झाला. मुलांकडून सक्तीने कामे करून घेणे, त्यांना अमानुष मारहाण करणे आणि लैंगिक शोषणाचे गंभीर प्रकार येथे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या संस्थेकडे निवासी विद्यार्थी ठेवण्याचा कोणताही वैध शासकीय परवाना नव्हता. मुलांच्या प्रवेशाची नोंद नाही, सुरक्षेसाठी कर्मचारी नाहीत आणि स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव अशा भीषण परिस्थितीत ही मुले राहत होती. प्राथमिक सोयी-सुविधा तर दूर, मुलांना वेळेवर अन्नाचाही पुरवठा होत नव्हता.

बालकल्याण समितीच्या आदेशानंतर, बालस्नेही टास्क फोर्स आणि आळंदी पोलिसांनी या २१ मुलांना तातडीने सुरक्षित शासकीय बालगृहात हलवले आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे आळंदी परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

Share This Article