पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदीडॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती

3 Min Read

पिंपरी, दि. ११ : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असून शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहराच्या प्रशासनाची धुरा आता त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
डॉ. सूर्यवंशी हे २००६ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे त्यांनी पीएच.डी. (व्यवस्थापन), एमबीए (मार्केटिंग), एलएलबी आणि बीएससी (फिजिक्स) असे शिक्षण पूर्ण केले आहे.

९ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रभावी प्रशासनाची छाप पाडली.

जिल्हा परिषद कोल्हापूर व पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांना गती दिली. त्यानंतर गोंदिया आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासनातील पारदर्शकता व विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असताना विभागातील प्रशासन सुसूत्र करण्याबरोबरच विविध विकास योजनांवर त्यांनी विशेष भर दिला.

शासनाने केलेल्या बदलीनुसार डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे. सध्या ते कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. नवीन पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्य सचिव यांच्या संमतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून पिंपरी-चिंचवड येथे कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

या संदर्भातील पत्र सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केले आहे. आदेशानुसार नवीन पदावर रुजू झाल्यानंतर त्याची माहिती तत्काळ शासनाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शासनाने नाशिक कुंभमेळा येथे बदली केली होती. त्यानंतर त्यांच्या जागेवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. निवडणुकीनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळावेत अशी मागणी नगरसेवक सातत्याने करत होते. शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पर्यावरणीय प्रश्न आणि वाढती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांसमोर मोठी प्रशासकीय आव्हाने असणार आहेत.

Share This Article