इराण-इस्रायल युद्ध तीव्र; नव्या सुप्रीम लीडरलाही इस्रायलचा इशारा

0
23

दि.०८ (पीसीबी)-मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचा आज आठवा दिवस असून युद्ध अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे इराणकडूनही इस्रायल आणि आखाती देशांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे या संघर्षाचा शेवट लवकर होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

अमेरिका आणि इस्रायलने स्पष्ट केले आहे की, इराणमध्ये सत्ताबदल होईपर्यंत आणि त्यांच्या मनासारखा नवा शासक येईपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, इस्रायलने एक मोठा इशारा दिला आहे. इराणमध्ये लवकरच नव्या सुप्रीम लीडरची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, इस्रायली डिफेन्स फोर्सेसने कठोर भूमिका घेतली आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, जो कोणी नवा सुप्रीम लीडर बनेल तसेच त्याच्या निवडीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांपर्यंतही इस्रायलचे हात पोहोचतील.

याचदरम्यान इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील तेल डेपो आणि इंधन साठ्यांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे तेहरानमधील इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून वितरण साखळीवर परिणाम झाल्याची माहिती तेहरानचे गव्हर्नर मोहम्मद सादेह यांनी दिली आहे.मध्यपूर्वेत सुरू असलेल्या या युद्धामुळे जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे.