इराण-अमेरिका संघर्ष तीव्र;तेलाच्या किंमतीवर ट्रम्प यांचे मोठे विधान

PCB Admin
2 Min Read

दि.०८ (पीसीबी) – मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात थेट कारवाई करत इराणच्या नौदलाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या कारवाईदरम्यान इराणच्या काही युद्धनौका बुडवल्याचेही सांगण्यात आले आहे.या युद्धाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून महागाईचा फटका अनेक देशांना बसू लागला आहे. गॅस आणि इंधनाच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला “छोटीशी कारवाई” असे संबोधत अमेरिकन सैन्य आणि इस्रायली हवाई दल तेहरानमधील महत्त्वाच्या इराणी ठिकाणांवर बॉम्बहल्ले करत असल्याचा दावा केला. दुसरीकडे इराणनेही प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे.

याचदरम्यान इराणकडून सौदी अरेबियातील तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दुबई विमानतळही इराणच्या निशाण्यावर असल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, युद्ध सुरू होण्यापूर्वीच तेलाच्या किंमती वाढतील याचा अंदाज होता आणि तो खरा ठरला. मात्र या किंमती जशा वाढल्या तशाच त्या कमीही होतील, असा दावा त्यांनी केला.

ट्रम्प यांनी इराणवर कठोर शब्दांत टीका करत, “आम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एक मोठा कॅन्सर नष्ट करणार आहोत. आम्ही त्या कॅन्सरला मुळासकट उपटून टाकू,” असे विधान केले. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ च्या हमास हल्ल्याचा उल्लेख करत जगाने त्या घटना विसरू नयेत असेही त्यांनी सांगितले.

 

Share This Article