दि.२२(पीसीबी)-अमेरिकेतील कुख्यात लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीनचा मृत्यू होऊन अनेक वर्षे झाली असली, तरी त्याच्या संपत्तीबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. तब्बल शेकडो दशलक्ष डॉलरच्या मालमत्तेचे वाटप नेमके कुणाच्या नावे करण्यात आले, याबाबत नव्या तपशीलांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.२०१९ मध्ये तुरुंगात मृत्यू झाला तेव्हा जेफ्री एपस्टीनची एकूण संपत्ती सुमारे ६०० दशलक्ष डॉलर असल्याचे समोर आले होते. अमेरिकन न्याय विभागाच्या माहितीनुसार, त्याच्या इच्छापत्रात अनेक व्यक्तींना मोठ्या रकमा देण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल, भाऊ मार्क एपस्टीन आणि वैमानिक लॅरी विसोस्की यांना प्रत्येकी १० दशलक्ष डॉलर देण्याचा उल्लेख आहे.
याशिवाय त्याची दुसरी प्रेयसी कॅरीना शुलियाक हिच्या नावे तब्बल ५० दशलक्ष डॉलरची मालमत्ता तसेच पॅरिसमधील अपार्टमेंट, पाम बीचमधील मालमत्ता, मॅनहॅटनमधील टाऊनहाऊस, न्यू मेक्सिकोतील जोरो रेंच, लिटिल सेंट जेम्स बेटावरील मालमत्ता आणि ३३ कॅरेट हिऱ्याची अंगठी देण्यात आल्याचे नमूद आहे.एपस्टीनकडे न्यूयॉर्क, पाम बीच आणि पॅरिसमध्ये आलिशान घरे, दोन खासगी बेटे, सुमारे ३८० दशलक्ष डॉलरची रोख व गुंतवणूक, तसेच हेलिकॉप्टर आणि दोन खासगी जेट विमानं होती. त्याच्या गुंतागुंतीच्या कंपन्या आणि ट्रस्टमुळे काही मालमत्तांवर अद्याप कायदेशीर वाद सुरू असून काही संपत्तींचा शोधही घेतला जात आहे.
दरम्यान, त्याच्या संपत्तीमधून पीडित महिलांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आतापर्यंत डझनभर पीडितांना सुमारे ३५ दशलक्ष डॉलर देण्यात आले असून यापूर्वीही शेकडो दशलक्ष डॉलरची भरपाई देण्यात आली होती.एपस्टीनने इतकी प्रचंड संपत्ती नेमकी कशी कमावली, हे मात्र आजही गूढच असून त्याच्या आर्थिक साम्राज्याबाबतचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.






































