महापालिका लवकरच मेगाभरती, तयारी सुरू

1 Min Read

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विस्तार झपाट्याने होत असून लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या नागरी सुविधांच्या गरजेमुळे प्रशासनावर ताण वाढला असून तो कमी करण्यासाठी महापालिका लवकरच मेगाभरती प्रक्रिया राबवणार आहे. पहिल्या टप्प्यात ४७१ पदे भरण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्यानंतर कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यानुसार सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला असून पूर्वीच्या ११,५१३ पदांच्या तुलनेत आता एकूण १६,८३८ पदांचा नवा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात ५,३२५ नव्या पदांची भरती केली जाणार आहे.
आगामी भरती प्रक्रियेत तांत्रिक, आरोग्य, सुरक्षा व स्वच्छता तसेच प्रशासन विभागातील रिक्त पदांना प्राधान्य दिले जाणार आहे. तांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता व इतर अभियांत्रिकी कर्मचारी, आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक यांची भरती होणार आहे. तसेच सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, माळी आणि लिपिक संवर्गातील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदेही भरली जाणार आहेत.

दरम्यान, महापालिकेने ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ४,६६८ वर पोहोचली आहे. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच मोठ्या प्रमाणात भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या तातडीच्या गरजेनुसार ४७१ पदांसाठी प्रशासकीय हालचाली वेगाने सुरू आहेत.

Share This Article