सलमान खानची उपस्थती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला

2 Min Read

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी थेट मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.

फक्त एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून सलमान खानला व्यासपीठावर घेतलं की इतर मुस्लिमांना देखील संघात प्रवेश देणार? असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. संघाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या उपस्थितीवर संजय राऊत म्हणाले की, “काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रम झाला. मलाही आमंत्रण होतं, पण मला दुसर्‍या एका कार्यक्रमाला जायचं असल्यानं मी गेलो नाही, नाहीतर मीही गेलो असतो. सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं? एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? फक्त सलमान खान या नटाला व्यासपीठावर आमंत्रण होतं की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. कारण ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे त्यामध्ये संघही सामील आहे.”

सत्ता गेल्यावर देखील हे कलाकार अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतील का? असा प्रश्नही राऊतांनी यानिमीत्ताने विचारला आहे. “मोदी, फडणवीस, अमित शाह व इतर सगळे लोकं जे हिंदू-मुसलमानचं द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत, ते सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्यामुळे सलमान खान आणि इतर कलाकारांना जे आपण आपल्या व्यासपीठावर घेतलंत, त्याबद्दल माझा एक प्रश्न आहे की, हे फक्त सलमान खान पुरतं मर्यादित होतं, की तो एक मोठा कलाकार आहे, लोकांना दाखवायला की सलमान खान देखील आमच्या व्यासपीठावर आला… सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोकं पुन्हा आपल्या व्यासपीठावर येतील का? हा फार गमतीचा प्रश्न आहे. जो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावर आला, क्या करेंगे भाई जाना पडता है,” असे संजय राऊत म्हणाले.

Share This Article