दिवंगत अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

0
3
  • पिंपरी चिंचवड शहर पत्रकारांनी शोकसभेत व्‍यक्‍त केल्‍या भावना

पिंपरी ! प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असलेल्‍या माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले अशा भावना पिंपरी चिंचवड शहर पत्रकारांनी व्‍यक्‍त केल्‍या. कितीही कठोर प्रश्‍न विचारले किंवा माध्यमातून लिखाण केले तरी पत्रकार बांधवांवर दबाव आणणे अथवा जाब विचारण्याचे प्रकार पवारांनी केला होता नाही. असे माध्यम स्‍वातंत्र्य जपणारा, विकासाभिमूख नेतृत्‍वाला पिंपरी चिंचवड शहरासह राज्‍य मुकले अशा भावनाही माध्यम प्रतिनिधींनी व्‍यक्‍त केल्‍या.

पिंपरी चिंचवड शहर पत्रकारांच्‍या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील सायन्‍स पार्कच्‍या सभागृहात पार पडलेल्‍या कार्यक्रमात आठवणीतले अजित पवार या विषयावर माध्यम प्रतिनिधींनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. या वेळी ज्‍येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, विवेक इनामदार, सुनिल लांडगे, सुनिल माने, नाना कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या आठवणींना उजाळा दिला.

ज्‍येष्ठ पत्रकार विवेक इनामदार म्‍हणाले की, बातमीदारांसाठी अजित पवार न्‍युज मेकर होते. ते शहरात आले आणि बातमीचा विषय दिला नाही असे होत नसे. क्रिकेट मध्ये कपील देव ज्‍या पद्धतीने बॅटिंग करायचे. त्‍या पद्धतीने भाषणात अजित पवारांची शब्दफेक होती. आक्रमक भाषण हे त्‍यांचे वैशिष्ट्ये होते. पत्रकारांच्‍या प्रश्‍नांवर ते हजरजबाबी पद्धतीन उत्‍तर देऊन हसवत होते. त्‍यांच्‍या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्याची वेळ यावी, या सारखे दुःख नाही.

अविनाश चिलेकर म्‍हणाले की, अजित पवार यांचे आणि पत्रकारांचे नाते अतिशय सोहार्दपुर्ण होते. महापालिका निवडणुकीत अनेक वेळा विविध विषयांवर वार्तांकन केले. या वेळी अजित पवारांनी स्‍वीय सहायकांमार्फत थेट संपर्क करत माहिती घ्यायचे. आक्रमक आणि विरोधी बातम्‍या लिहिल्‍या तर असे का लिहिले म्‍हणून कधीही संपर्क करत नव्हते. त्‍यांच्‍या निधनानंतर हे राज्‍य मोठ्या नेत्‍याला मुकले आहेच. मात्र पिंपरी चिंचवड शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माध्यमातील प्रतिनिधींनी त्‍यांची भूमिका रोखठोक मांडणे गरजेचे आहे.

सुनिल लांडगे म्‍हणाले की, पत्रकारितेच्‍या माध्यमातून अनेक वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍याशी बोलण्याचा संपर्क आला. त्‍यांच्‍या प्रति सांगण्यासारख्या असंख्य आठवणी आहेत. शहरातील विकासात त्‍यांनी दिलेले योगदान आणि केलेली विकासकामे मी जवळून अनुभवली आहेत. त्‍याचा साक्षिदार आहे. त्‍यांच्‍या सारखे व्‍हीजन कोणाकडे नाही.

ज्‍येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने म्‍हणाले की, मॉल संस्‍कृतीचा उदय शहरात होत असताना चटई कामगार, पथारीसारखे छोटे व्‍यावसायिकांची जागा शहरीकरणात काय आहे असा प्रश्‍न विचारणारी मी बातमी केली होती. या बातमीवर स्‍वतः अजित पवार यांनी संपर्क करत शहराचा विकास कसा होणे अपेक्षित आहे. सर्वच स्‍तरातील नागरिकांना आपण न्‍याय देणार असल्‍याची भूमिका समजावून सांगितली. बातमीवर बारीक लक्ष ठेवून स्‍वतः भूमिका मांडणारे ते नेतृत्‍व होते.

नाना कांबळे म्‍हणाले की, बारामती लोकसभा निवडणुकीला प्रथम अजित पवार सामोरे जाताना त्‍यांचे केलेले वार्तांकन पाहून त्‍यांनी स्‍वत ती गोष्ट लक्षात ठेवली होती. त्‍यांनी शहराच्‍या उभारणीत घातलेले लक्ष वाखाणण्यासारखे आहे. त्‍यांची भूमिका त्‍यांनी योग्य पद्धतीने निभावली आहे. पुढे आपल्याला त्‍यांची भूमिका माध्यमातून पुढे नेली पाहिजे.

या वेळी अमोल काकडे, विकास शिंदे, प्रकाश गायकर, ज्ञानेश्‍वर भंडारे, उमेश अनारसे, पंकज खोले, रोहित खर्गे यांनी अजित पवारांविषयी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्या. अमोल शिंत्रे, संजय शिंदे, वर्षा कांबळे, अश्‍विनी पवार, राहुल हातोले, लिना माने, प्रशांत साळुंखे, मंगेश सोनटक्‍के आदी उपस्‍थित होते.

सूत्रसंचालन अमृता ओंबाळे यांनी केले. प्रास्‍ताविक प्रदीप लोखंडे यांनी केले.