रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कार फ्लॅशमॉबला मोठा प्रतिसाद; बालगोकुलमचे आयोजन

0
3

चिंचवड दि.३० – एल्प्रो मॉल मध्ये एकसारख्या गणवेशातील शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन १३ सूर्यनमस्कार घालत समृद्ध भारतीय योग परंपरेची जागृती केली. रथसप्तमीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड जिल्हा बालगोकुलम आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार फ्लॅशमॉब या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल मध्ये करण्यात आले होते.

या उपक्रमात शहरातील विविध भागातील ३० सोसायट्यांमधून, १४० मुलांनी सहभाग घेतला व १३ समंत्र सूर्यनमस्कार घातले. या उपक्रमाच्या नियोजनात २३ पुरुष स्वयंसेवक व २७ महिला स्वयंसेविकांचा सहभाग होता. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बालगोकुलम सध्या भारतातील प्रमुख महानगरांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे. बालगोकुलम संस्थेतर्फे पिंपरी चिंचवड शहरातील विविध सोसायट्यांमधील लहान मुलांना संस्कारक्षम करण्याकरिता तसेच राष्ट्र सर्वप्रथम ही भावना रुजवण्यासाठी निःशुल्क संस्कारवर्ग चालविले जातात ज्यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, बौद्धिक तसेच सामाजिक असे विविध उपक्रम घेतले जातात. आठवड्यातून एकदा सोसायटीमधीलच मातृशक्तीच्या आधारे हा बालगोकुलम उपक्रम चालवला जातो. प्रामुख्याने वयवर्ष ५ ते १४ या वयोगटातील मुलांकरिता या उपक्रम चालतो. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्कार, सेवा या मूल्यांसह मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली जाते असे पिंपरी चिंचवड जिल्हा बालगोकुलम संयोजक चंद्रशेखर भालेराव यांनी सांगितले तसेच एलप्रो मॉल प्रशासनाचे आभार मानले.